Friday, January 06, 2006

बाळाची आंघोळ . . .

आज सकाळी बाळाला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम बघितला. इतक्या दिवसांनी आज बघण्याचे कारण म्हणजे रोज मी ऑफिसला गेल्यावर त्याची आंघोळ होते. आज मला उठायला जरा उशीर झाला म्हणुन मला हा "बाळाची आंघोळ" नामे उपक्रम बघायला मिळाला. अबब. . . केवढा हा खटाटोप !

आमच्या येथलीच एक वयस्कर बाई बाळाला आंघोळ घालायला येते. सकाळी आईच्या दुधाची न्याहारी झाल्यामुळे बाळोबा मस्त खुश होते, आणी हा मावशी नावाचा व्हिलन त्याच्या शो मध्ये आला. हा व्हिलन त्याचा आईने आणि आजीने संगनमत करुन त्याचा आयुष्यात आणला आहे हे अजुन त्याला समजलेले नाही हे एक बरेच झाले. तर, आमच्या बाळाच्या आंघोळीचा हा इतीवृतांत. . .

आधी त्या "मावशी"ने बाळाचे सर्व कपडे काढले. आमच्या बाबुला कपडे काढले की राग येतो. लगेच तोंड वाकडे करुन त्याने त्याचा राग आळवायला सुरवात केली. आवाज चांगला आहे पटठ्याचा. कपडे काढुन झाल्यावर मावशीने त्याला मांडीवर झोपवला आणी मस्त तेल लावुन रगडायला सुरवात केली. तसे बाबुचा सुर चढायला लागला. मैफिल रंगायला लागली होती. बाळाची पुढची बाजु रगडुन झाल्यावर मावशींनी त्याला हळुच पालथा केला. झाले आता तर त्याचे रडायची पण बोंब झाली. मावशींनी आपले मस्तपैकी पिठ मळल्यासारखे त्याच्यावर मालिश नावाचा उपक्रम राबविला.

मालिश संपल्यावर आता बाळाच्या आंघोळीची तयारी सुरु झाली. आता "बाळाची आंघोळ" नाटकाचा दुसरा अंक सुरु झाला. परिस्थीती तीच फक्त जागा बदलली. बाळोबा खोलीतुन मोरीत आले पण अजुन मावशींच्या मांडीवरच. आधी सर्वांगाला बेसन लावण्यात आले. मग बेबी सोप लावुन आंघोळ घालण्यात आली. अंगावर पाणी पडताच बाळासाहेबांनी असा काय सुर लावला म्हणुन सांगु, "बाळगंधर्व" मोरित अवतिर्न झाल्या सारखे वाटले. आंघोळ झाल्यावर बाळाला शेक देउन कापडात असे काही गुंडाळले की जसे काही ते ह्या सर्व उपद्रवाला कंटाळुन पळुनच जाणार आहे.

खरेतर जुन्या रिती, पद्धती पाळण्याच्या नादात व अट्टाहासापायी तान्हुल्यांवर इतका अतीरेक केला जातो, पण सांगेल कोण. डॉक्टरनी मला व कृपालीला (माझी पत्नी) बरोबरच सांगीतले की बाळाला आईनेच आंघोळ घालावी. आंघोळ घालतांना त्याच्याशी गप्पा माराव्यात, हसत-खेळत आंघोळ घालावी. असे केल्याने बाळ हसरे व खेळकर होईल. पण कृपालीला एवढ्या लहान बाळाला आघोळ घालायची भीती वाटते.
सकाळचा सर्व खाटाटोप बघुन मी ठरवुन टाकले की उद्यापासुन बाळाला मी आंघोळ घालणार. खरे पाहीलेतर डॉक्टर सुद्धा सांगतात की बाळांना कसल्याही तेल, पावडर, शॅम्पू, वैगरेची गरज नसते. त्यांची त्वचा ह्या सर्व गोष्टींसाठी तयार नसते. तसेच एवढ्या लहान बाळांना कसल्या-कसल्या ऍलर्जी आहेत हे सुद्धा आता माहीत नसते व या तेलांमध्ये, पावडरमध्ये काय काय रसायनं घातली असतात ते देवच जाणे.

तर मी ठरवीले आणी घरी आल्यावर कृपालीकडे माझा निर्णय लगेच जाहीर करुन टाकला "जर तुला बाळाला आंघोळ घालायला भिती वाटत असेल तर उद्या पासुन बाळाला मी आंघोळ घालणार". मला ह्या सुखा पासुन वंचित रहायचे नाही, कारण हे सुख मला बाळ मोठ झाल्यावर मिळणार नाही. मला माझ्या बाप होण्याच्या सुखात जराही कसुर ठेवायची नाही.

झाले. . . . माझा निर्णय ऐकुन घरात सगळ्यांना टेंशन आले आहे. बघु उद्या मला सहकार्य करतात की माझाच बाबु करतात ते.

4 comments:

Pawan said...

छान निर्णय आहे. मग तुमचा बाबू झाला की बाळाने हसतखेळत नवीन नाटकाचा (म्हणजे तुम्ही आंघोळ घालण्याचा) प्रयोग सहन केला?

rohinivinayak said...

बाळाबद्दल लिहिलेले सर्व अनुभव वाचले. वाचून खूप छान वाटले. तुमचा छकुलाही छान आहे. एका वडिलांकडून अनुभव वाचायलाही मजा आली.

rohinivinayak said...

बाळाबद्दल लिहिलेले सर्व अनुभव वाचले. वाचून खूप छान वाटले. तुमचा छकुलाही छान आहे. एका वडिलांकडून अनुभव वाचायलाही मजा आली.

rohinivinayak said...

बाळाबद्दल लिहिलेले सर्व अनुभव वाचले. वाचून खूप छान वाटले. तुमचा छकुलाही छान आहे. एका वडिलांकडून अनुभव वाचायलाही मजा आली.