Monday, February 13, 2006

छकुल्याचे फोटो. . .

10 फेब्रुवारी 2006 रोजी आमच्या छकुल्याचे बारसे झाले. कार्यक्रम एकदम मस्त झाला. बाळाचे नाव "प्रणव" ठेवले आहे. बारश्याच्या दिवशी काढलेले प्रणवचे काही फोटो:



Friday, January 27, 2006

निसर्गाची लहर, आमची परिक्षा

अचानक पुण्याचे तापमान घसरले आणि आमची परिक्षा सुरु झाली. थंडी एकदम वाढल्यामुळे सध्या आमचे बाळराजे गारठले आहेत. सर्दी मुळे त्याला खुपच त्रास होतो. दिवसा ठिक असतो मात्र रात्री थंडी वाढली की मात्र हैराण होतो (आणि आम्हाला हैराण करतो). सर्दी मुळे नाक बंद होते आणि मग श्वास घ्यायची पंचाईत होते. मग काय विचारायला नको. सध्या आमच्या घरात रात्रीच्या रागांची मैफल सुरु आहे. रोज नविन राग, रोज नविन संगित, श्रोते मात्र आम्हीच.
काल त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, सर्दीचा त्याला खुप त्रास होतोय म्हणुन. डॉक्टरांनी सांगितले, हवामान परत बदलणार नाही याचा मला उपाय सांगा, मी बाळाला कधिच सर्दी होणार नाही असे औषध देतो. आता काय बोलणार! आमचा डॉक्टर पण एकदम फुल्लुस कॅरेक्टर आहे. त्यांनी बाळाला नाकात टाकायचे ड्रॉप्स दिलेत, मिठाचे पाणी आहे. बाळाच्या नाकात ड्रॉप्स कसे टाकायचे (तिचा हात भितीने थरथरतो) म्हणुन बायकोने आधी माझ्या नाकात ड्रॉप्स टाकले आणि मग बाळाच्या नाकात टाकायला सुरवात केली.
आता रात्री आळीपाळीने जागायचे आणि बाळाला सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की ड्रॉप्स त्याचा नाकात टाकायचे अशी 100 मार्कांची प्रात्यक्षिकांची परिक्षा सुरु आहे.

हि चाचणीच आहे अजुन अशा बर्‍याच परिक्षा पुढे द्यायच्या आहेत.

Tuesday, January 24, 2006

लहरी सुलतान

आज बर्‍याच दिवसांनी लिहीण्यास वेळ मिळाला आहे. एका प्रोजेक्ट मुळे अजिबात वेळच मिळाला नाही. आता परत लिहीण्यास सुरवात करतोय.
सध्या बाळाची प्रगती एकदम मस्त आहे. चार दिवसांपुर्वी त्याला पोलियो व काविळीची लस दिली. ईंजेक्शन देतांना पट्ठ्या अजिबात रडला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा एकदम खुशीत ईंजेक्शन दिले. आता त्याचा दिनक्रम सुद्धा एकदम लहरीसुलताना सारखा झाला आहे. कधी दिवसा जागा राहतो व रात्री मस्त झोपतो तर कधी रात्रभर जागतो. त्यामुळे घरात आमचे घड्याळच बदलले आहे. आई सुद्धा कधी-कधी रात्रभर जागतात. ती एक बिचारी खुप काम करते. सकाळी पाच वाजल्यापासुन जे काही कामाला जुंपुन घेते ते रात्री उशीरापर्यंत काम करत असते. कधी-कधी रात्री सुद्धा बाळाबरोबर जागते. पुन्हा सकाळी पाच वाजता कामाला सुरवात. नातवाने आजीला सॉलीड कामाला लावले आहे.
10 फेब्रुवारी किंवा 15 फेब्रुवारीला बाळाचे बारसं करायचे ठरवले आहे. घरी कामं पडायला नकोत म्हणुन हॉलवर करणार आहे. तुम्हा सर्वांना आमंत्रण मिळेलच. सध्या बारश्याची एक तयारी सुरु आहे.

Sunday, January 15, 2006

रात्र जागवतोय. . . आणि खुदकन हसतोय. .

छ्कुल्याची प्रगती खुप चांगली आहे. तो आताच पालथे व्हायला बघतोय. मात्र सद्ध्या तो आम्हाला रात्रीचे जागवतोय. कृपालीची तर पुरती दमछाक होते. तिला बिचारीला व्यवस्थित झोपायला सुद्धा मिळत नाही. बाळोबा आपले निवांत रात्रीचे जागे राहतात आणि सगळ्यांना जागवतात. सद्ध्या त्याचा दिनक्रम बदलला आहे. तो दिवसा मस्त झोपतो आणि रात्रीचे जागतो. नुसता एकटक छताकडे पहात बसतो. मांडीवर घेउन बसावे लागते. खाली ठेवले की रडायला लागतो. त्याला आता गुदगुल्या केलेल्या समजतात. पायांना गुदगुल्या केल्या किंवा नाकाला हळुच हात लावला की मस्त गोड हसतो. रात्रीच्या जागरणाचा सगळा शिण निघुन जातो.
छकुला काल दुपारी स्वत:च पालथा झाला होता असे कृपालीने मला संध्याकाळी ऑफिसहुन आल्यावर सांगितले. पुरुषांना बाळाचे "पहिले" बघण्याचे सुख फार कमी असते. मला त्याची प्रत्येक प्रगती बघायची आहे. बघुया संधी किती मिळते.