Friday, January 27, 2006

निसर्गाची लहर, आमची परिक्षा

अचानक पुण्याचे तापमान घसरले आणि आमची परिक्षा सुरु झाली. थंडी एकदम वाढल्यामुळे सध्या आमचे बाळराजे गारठले आहेत. सर्दी मुळे त्याला खुपच त्रास होतो. दिवसा ठिक असतो मात्र रात्री थंडी वाढली की मात्र हैराण होतो (आणि आम्हाला हैराण करतो). सर्दी मुळे नाक बंद होते आणि मग श्वास घ्यायची पंचाईत होते. मग काय विचारायला नको. सध्या आमच्या घरात रात्रीच्या रागांची मैफल सुरु आहे. रोज नविन राग, रोज नविन संगित, श्रोते मात्र आम्हीच.
काल त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, सर्दीचा त्याला खुप त्रास होतोय म्हणुन. डॉक्टरांनी सांगितले, हवामान परत बदलणार नाही याचा मला उपाय सांगा, मी बाळाला कधिच सर्दी होणार नाही असे औषध देतो. आता काय बोलणार! आमचा डॉक्टर पण एकदम फुल्लुस कॅरेक्टर आहे. त्यांनी बाळाला नाकात टाकायचे ड्रॉप्स दिलेत, मिठाचे पाणी आहे. बाळाच्या नाकात ड्रॉप्स कसे टाकायचे (तिचा हात भितीने थरथरतो) म्हणुन बायकोने आधी माझ्या नाकात ड्रॉप्स टाकले आणि मग बाळाच्या नाकात टाकायला सुरवात केली.
आता रात्री आळीपाळीने जागायचे आणि बाळाला सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की ड्रॉप्स त्याचा नाकात टाकायचे अशी 100 मार्कांची प्रात्यक्षिकांची परिक्षा सुरु आहे.

हि चाचणीच आहे अजुन अशा बर्‍याच परिक्षा पुढे द्यायच्या आहेत.

Tuesday, January 24, 2006

लहरी सुलतान

आज बर्‍याच दिवसांनी लिहीण्यास वेळ मिळाला आहे. एका प्रोजेक्ट मुळे अजिबात वेळच मिळाला नाही. आता परत लिहीण्यास सुरवात करतोय.
सध्या बाळाची प्रगती एकदम मस्त आहे. चार दिवसांपुर्वी त्याला पोलियो व काविळीची लस दिली. ईंजेक्शन देतांना पट्ठ्या अजिबात रडला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा एकदम खुशीत ईंजेक्शन दिले. आता त्याचा दिनक्रम सुद्धा एकदम लहरीसुलताना सारखा झाला आहे. कधी दिवसा जागा राहतो व रात्री मस्त झोपतो तर कधी रात्रभर जागतो. त्यामुळे घरात आमचे घड्याळच बदलले आहे. आई सुद्धा कधी-कधी रात्रभर जागतात. ती एक बिचारी खुप काम करते. सकाळी पाच वाजल्यापासुन जे काही कामाला जुंपुन घेते ते रात्री उशीरापर्यंत काम करत असते. कधी-कधी रात्री सुद्धा बाळाबरोबर जागते. पुन्हा सकाळी पाच वाजता कामाला सुरवात. नातवाने आजीला सॉलीड कामाला लावले आहे.
10 फेब्रुवारी किंवा 15 फेब्रुवारीला बाळाचे बारसं करायचे ठरवले आहे. घरी कामं पडायला नकोत म्हणुन हॉलवर करणार आहे. तुम्हा सर्वांना आमंत्रण मिळेलच. सध्या बारश्याची एक तयारी सुरु आहे.

Sunday, January 15, 2006

रात्र जागवतोय. . . आणि खुदकन हसतोय. .

छ्कुल्याची प्रगती खुप चांगली आहे. तो आताच पालथे व्हायला बघतोय. मात्र सद्ध्या तो आम्हाला रात्रीचे जागवतोय. कृपालीची तर पुरती दमछाक होते. तिला बिचारीला व्यवस्थित झोपायला सुद्धा मिळत नाही. बाळोबा आपले निवांत रात्रीचे जागे राहतात आणि सगळ्यांना जागवतात. सद्ध्या त्याचा दिनक्रम बदलला आहे. तो दिवसा मस्त झोपतो आणि रात्रीचे जागतो. नुसता एकटक छताकडे पहात बसतो. मांडीवर घेउन बसावे लागते. खाली ठेवले की रडायला लागतो. त्याला आता गुदगुल्या केलेल्या समजतात. पायांना गुदगुल्या केल्या किंवा नाकाला हळुच हात लावला की मस्त गोड हसतो. रात्रीच्या जागरणाचा सगळा शिण निघुन जातो.
छकुला काल दुपारी स्वत:च पालथा झाला होता असे कृपालीने मला संध्याकाळी ऑफिसहुन आल्यावर सांगितले. पुरुषांना बाळाचे "पहिले" बघण्याचे सुख फार कमी असते. मला त्याची प्रत्येक प्रगती बघायची आहे. बघुया संधी किती मिळते.

Wednesday, January 11, 2006

छ्कुल्याचा प्रसाद...

आज माझी मावशी आणी तिचे सर्व कुटूंब पुण्याला आले होते. मावसभावाच्या मेव्हण्याचे लग्न होते आज पुण्यात. तिथुन ती सर्व मंडळी माझ्या घरी आली, छकुल्याला भेटायला. आजीने आणि आत्याने छकुल्याला नविन कपडे आणले आहेत. नेमके सगळे घरी आले तेव्हा बाळोबा झोपले होते. मग सगळे त्यांची झोप होईसतोवर वाट बघत बसले.
मावस भावाची मुलगी सुद्धा आली होती बरोबर. ती आता तिसरीत आहे. ऋचा तिचे नाव. तीला बाळ तिच्या मांडीवर पाहेजे होते. तिला बाळ झोपले आहे ते पटेचना. तिला वाटले तिच्या जवळ बाळाला द्यायचे नाही म्हणुन सर्व खोटे सांगत आहेत. पाच-सहा वेळा मागुन बघितले पण तेच उत्तर आल्यावर मग बाई साहेब रुसुन वर्‍हांड्यात जाउन बसल्या. काही खायला हवे का विचारले तर "नको". दुध प्यायचे का विचारले तर "नको". एवढ्यात बाळ उटलं. तसे तिला बाळ हवे का विचारले तर सवयिने तिने "नको" असे म्हंटले, मग एकदम तिच्या लक्षात तिची चुक आली तशी ती ताडकन उटली आणि दे, दे करुन ओरडायला लागेली. मग काय, आम्ही "आत तु नको म्हणालीस, मग आत नको" असे म्हणुन तिची थोडावेळ मस्करी केली. मग बाळाला घ्यायचे म्हणुन तिने सांगीतलेली सगळी कामे ऐकली.
थोड्यावेळाने बाळाला तिच्या मांडिवर दिल्यावर इतकी खुश झाली. पण आमचे बाळोबा तेव्हडेच खट्याळ. त्यानी लगेच तिच्या अंगावर सु केली. मग काय सांगु, ऋचाचा चेहरा इतका बघण्यासारखा झाला होता. तशात सुद्धा तिने एक चांगले केले बाळाला तिच्या मांडिवरुन उचले स्तोवर तिने अजिबात गडबड केली नाही. हुशार आहे पोरगी! बाळाला उचल्यावर मग तिने असे काही रडायला सुरवात केली, सगळे घर डोक्यावर घेतले.
छ्कुल्याने तिला आपला प्रसाद दिला.

Tuesday, January 10, 2006

तशी पद्धत आहे म्हणुन

आज सकाळी कृपाली व बाळाला घेऊन दवाखान्यात रुटीन चेकअप साठी गेलो होतो. बरोबर आई सुद्धा होती. आई म्हणजे माझ्या सासुबाई. माझे आई-वडील, भाऊ, लहान बहीण सगळे नाशिकला असतात. मी कामा निमित्त पुण्यात असल्यामुळे कृपालीची आई आमच्या बरोबरच असते (मागिल लेखांमध्ये ज्यांना मी आई म्हटले आहे त्या ह्या माझ्या सासुबाई). माझ्या आईने आम्हां भावंडांना, मोठ्या भावाच्या व लहान बहिणीच्या मुलांना कधीच कसली गुटी पाजली नाही. एवढच काय आम्हाला कोणालाच फॅरेक्स, सेरेलॅक, ग्राईप वॉटर वै. काहीच कधी दिले नाही. तिचे सांगणे एवढेच - बाळाच्या आईने भरपुर आणी पौष्टीक असे सर्व खाल्ले पाहीजे, तिने पथ्य व्यवस्थित पाळली पाहीजेत, म्हणजे बाळाला तिच्या दुधातुन सर्व काही मिळते. बाळाची वाढ व्यवस्थित होते, त्याला पुढे कसले त्रास होत नाहित. अहो, लहानपणी आई आम्हा तीन्ही भावंडांना कारल्याचा भरपुर रस काढुन प्यायला द्यायची.
माझ्या आईचा पहिल्यापासुनच बाळाला गुटी वै. देण्याला विरोध. तिने कृपालीला, तिच्य आईला, मला बजावुन ठेवले होते त्याबद्दल, तरी त्यांनी बाळाला गुपचुप गुटी दिली.
आज मुद्दाम आईला (सासु) सुद्धा डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो. त्यांचे गैरसमज दुर करायला. डॉक्टरांनी बाळाला व कृपालीला तपासुन दोघेही व्यवस्थित आहेत म्हणुन सांगितले. बाळाची प्रगती उत्तम आहे. वजन चांगले 500ग्रॅम वाढले आहे. डॉक्टरांनी सांगितले, बाळाची प्रगती एकदम चांगली आहे.
दोघींनी एकदमच सांगितले, बाळ दुध प्यायला की लगेच शी करतो म्हणुन. डॉक्टरांनी सांगितले की ते एवढ्या लहान मुलांच्या बाबतीत स्वाभविक असते. मग त्यांनी नीट समजावुन सांगितले. एवढ्या लहान मुलांना मोठ्यांसारखे शी-शु धरुन ठेवता येत नाही. त्यांचा त्या अवयवांवर ताबा अजुन आलेला नसतो. त्यामुळे पोटात मल-मुत्र तयार झाले की ते लगेच बाहेर पडते. आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे, माणसांना काहीही खाल्यावर त्याचा निचरा होण्यासाठी सहा तासांचा अवधि लागतो. त्यामुळे ते जी शी आता करत आहेत ती साधारण सहा तासा पुर्वी प्यायलील्या दुधाची असते. त्यात काळजी करण्याचे काहीच कारण नसते. मग मीच सांगितले की दोघींनी बाळाला, तो सारखी शी करतो म्हणुन गुटी उगाळुन दिली म्हणुन. आधि डॉक्टर गुटी का दिली म्हणुन चिडले. मग त्यानी विचारले गुटीत काय काय होते. तर आईंनी सांगितले बदाम, खारीक व आणखी काहीतरी. आता हे आणखी काहीतरी म्हणजे काय हे दोघींना ही माहित नव्हते. डॉक्टरांनी विचारले, ज्या पद्धार्थात काय-काय वस्तु किती प्रमाणात आहेत हेच महित नसेल तो पद्धार्थ बाळाला देण्याचे कारणच काय? झाले. . आता ह्यावर काही उत्तर नव्हते. मग डॉक्टरांनी गुटीचा फॉर्म्युला आणि ते देण्याचे कारण सांगितले. बहुतेक गुट्यांमध्ये थोड्या प्रमाणात अफु मिसळलेली असते. बाळ सारखे रडते म्हणुन त्याला गुटी देतात कारण गुटी दिल्यावर बाळ बराच वेळ शांत झोपतं. ते शांत झोपण्याचे कारण त्यातील अफु असतो. अफु मुळे बाळ बराच वेळ गुंगित असते. आता हे तुम्हाला महित होते काय? हि गोष्ट बहुतेक बायकांना माहित नसते. बहुतेक घरांमध्ये मुलांच्या बाबतीत, बाळंतिणीच्या बाबतीत, बर्‍याचशा गोष्टी निव्वळ तशी पद्द्त आहे म्हणुन केल्या जातात. त्या मागे शास्त्रिय कारण असे काही नसते. गुटी का द्यायची तर "बारा दिवसांनी देतात", "बाळाला सव्वा महिना होईस्तोवर बाहेर काढायचे नाही" - त्याला सकाळचे कोवळे ऊन सुद्धा दाखवात नाहीत. "त्याच्या जन्मवारी त्याला आंघोळ घालायची नाही". आता तुम्हीच सांगा "बाळाला जॉंन्सन बेबी पावडर लावलीच पाहिजे" ही पद्धत कोणी तयार केली? डॉक्टरांनी सांगितले, तुम्हाला बाळ नशेत ठेवायचे असेल तर अवश्य त्याला गुट्या पाजा. पुर्वी घरातिल वयस्कर बायका, आजी स्वत: गुटी बनवायच्या तेव्हा कमीतकमी त्यात काय घतले आहे ते माहित तरी असायचे, आता बाजारातुन विकत आणतात आणि उगाळुन देतात, त्याची खात्री कोणी घ्यायची. जॉंन्सन बेबी प्रॉडक्टस मध्ये लहान मुलांसाठी विशेष असे काहिच नसते हे सिद्ध झाल्यामुळे, महाराष्ट्र एफ.डी.ए. ने खोट्या जाहिराती केल्या बद्दल कंपनी वर खटला दाखल केला आहे आता बोला.
आपण एखादी गाडी नविन घेतो तेव्हा मेक़ॅनिकला विचारुन तो सांगेल तेच पेट्रोल, तेल टाकतो. मग बाळाच्या बाबतीत आम्ही डॉक्टर जे सांगतो ते का करत नाहीत. तेव्हा गाडी पेक्षा आपलं मुल जास्त किमती आहे हा विचार तुमच्या मनात येत नाही का?

घरात पाळल्या जाणार्‍या बर्‍याच पद्धती ह्या, "तशी पद्धत आहे" म्हणुन पाळल्या जातात. त्या मागची कारणे किती जण सांगु शकतात? कधी याचा विचार केला आहे?

Monday, January 09, 2006

"इतकी" बाळंतपण आणि त्यातुन उमजलेलं बायकांचे ज्ञान. .

आज घरात सगळे शांत आहे. माझ्या कालच्य गोंधळामुळे बाळाला गुटी वैगरे पाजने बंद झाले आहे. तरी मला सारखे टेंशन आहेच. काय आहे, ही मंडळी मी घरा बाहेर पडल्यावर, माझ्यामागे काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे घराबाहेर असलो की सारखे, घरी बाळाला काही बाहेरचे दिले तर नसेलना असा सारखा विचार मनात येत असतो. घरी आल्यावर, विचारायची सोय नाही, पुन्हा भांडण आणी रडारड सुरु व्हायची भिती आहेच. त्यामुळे विचार करुन डोक्याची कलई झाली आहे.
बाकी आमचे बाळोबा एकदम मजेत आहेत. बाळाला गुटी देण्याचे कारण मी जाणुन घेण्याचा थोडा प्रयत्न केला. मला समजले की, बाळ दुध पिल्यावर शी करतो ती थांबावी म्हणुन गुटी. मी कपाळाला हातच लावला. म्हणजे ह्या समस्त बायकांनी जी काय एवढी बाळंतपनं काढलेली असतात त्यातुन ह्यांना ज्ञान असे काहीच मिळालेले दिसत नाही. ह्यांना बाळाची वाढ कधी-कशी होत तेच अजुन उमगलेलं नाही. बाळाला खरच कशाची गरज असते तेच नीट समजुन घेण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला नाही.
थोडक्यात काय तर केस बांधले की डोके चालत नाही. अहो चालणार तरी कसे, घोड्याला बांधुन ठेवले तर तो पळणार कसा. म्हणुनच की काय बहुतेक कर्तृत्वान स्त्रिया केसांचा बॉबकट करत असाव्यात.
बाळांचे सगळॆ मोठ्यापेक्षा वेगळे असते. ह्यांना कधीही शी होते, उलट्या होतात, उचक्या लागतात. हे सर्व त्यांचासाठी अगदी नॉरमल असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांचा मेंदु त्यांच्या शरिराचा खर्‍या अर्थाने ताबा मिळवायचा प्रयत्न सुरु करतो. त्या सगळ्या प्रयत्नात बाळ बर्‍याच गोष्टी मोट्यांच्या दृष्टीने ऍबनॉर्मल अशा करतो, परंतु त्या बाळासाठी नॉरमल असतात. त्यांची पचनेंद्रिये व्यवस्थीत विकसीत होण्यासाठी थोडा कालावधी जावा लागतो. त्या दरम्यान सगळी नवजात बाळं दुध प्यायल्यावर शी, शु करतात. त्यात काळजी करण्यासारखे काही नसते. जसजसे त्यांची पचनांद्रिये विकसीत होत जातात, तसे त्यां हे प्रमाण कमी व्हायला लागते. उलट, जर बाळाने काहीच केले नाही तर मात्र काळाजी करावी, किंवा शीचा रंग बदलला तर काळजी करावी. इतर वेळेस काळजी करण्याची गरज नसते. एवढी गोष्ट, ह्या बायकांना "इतकी" बाळंतपण काढुन सुद्धा कळु नये? बरं बहुतेक सर्व डॉक्टर या बद्दल सर्व स्त्रियांना डिलेव्हरी नंतर समजाउन सांगतात. तरी हा गाढवपणा!
त्यामुळे कधी-कधी बाप झालो आहोत म्हणुन, पोराच्या हितासाठी कठोर वागावे लागते. त्याशिवाय असल्या गोष्टींना पायबंद बसत नाही.

आज बाळाबरोबर खुप वेळ नाही घालवता आला. मी घरी आलो तेव्हा बाळोबा गुडूकले (झोपले) होते. थोड्यावेळासाठीच राजे उठले. तेवढ्या वेळेत त्यांनी शी, शु चा कार्यक्रम उरकला, पोटोबा केला, इकडे-तिकडे काही दिसते का ते बघण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा निद्राधीन झाले. इतक्या थोड्या दिवसात बाळाची प्रगती एकदम चांगली आहे. आताच कुशी परततो. पाय मारुन वर सरकायचा प्रयत्न सुद्धा करतो. मान सुद्धा वर उचलण्याचा प्रयत्न चाललेला असतो. तो मान लवार सावरायला लागणार असे दिसतेय. कृपाली सांगत होती आज दुपारी त्याने, पायावर जोर देऊन कंबर उचलली होती दोन वेळा.
बापाच्या नशिबात "बाळाचे पहीले" बघण्याची संधीच खुप थोडी असते. आपल्याला कायम बायको कडुन ऐकुन समाधान मानावे लागते. हा आनंद आपल्या नशिबात खुप थोडाच लिहीला आहे.

Sunday, January 08, 2006

बाळगुटीचे रामायण. . .

आज सकाळी घरात मी खुप चीडचीड केली. आईने बाळाला कसली तरी गुटी भरवली. डॉक्टरांनी आणि मी सुद्दा क़ृपालीला आणि घरात सगळ्यांना सांगुन ठेवले होते की बाळाला कमीतकमी तीन महीने तरी आईच्या दुधाशिवाय बाहेरचे काहीही द्यायचे नाही, आणि नंतर सुद्दा डॉक्टरांना विचारल्याशिवाय, दुधा व्यतिरीक्त इतर काही द्ययचे नाहि. तरी आज बाळाला गुटी उगाळुन पाजली. मला समजल्यावर खुप राग आला. मग मी घरात सगळ्यांना वाटेल तसे बोललो. माझ्यामुळॆ आज घरात जरा गरम वातवरण आहे. माझ्याशी मी विचारल्याशिवाय कोणी बोलत नाही.

आता तुम्हीच सांगा माझे काय चुकले. आपण बाजारातुन आणलेला शर्ट सुद्दा निट जपुन वापरतो, मग मुलांच्या बाबती असे का वागतो. नवजात बाळांना आईच्या दुधाव्यतिरीक्त कशाची गरज नसते. त्यांची पचनसंस्था बाहेरच्या कोणत्याही खाद्यपदार्थासाठी तयार नसते, तसेच त्यांची सर्व इंद्रिय, पचनादी कार्य सुरळित सुरु व्हायला अजुन वेळ असतो. त्या कालावधीत आपण जर त्यांचावर असा अतीरेक करत राहिलो तर त्यांच्या शरिरातील पचनादी कार्य करणार्‍या संस्थांचा विकास व्यवस्थीत होत नाही. मग पुढे त्यांना, कोठा घट्ट होणे, संडासला व्यवस्थित न होणे, अंगावर पांढरे चट्टे उठणे इ. विकार होतात.
हे सगळे डॉक्टरांनी समजाउन सांगितले तरी घरातल्या बायकांना असला शहाणपणा करण्यात धन्यता वाटते. त्यांना हे करु नको सांगीतले की त्यांचे एकच ठरलेले उत्तर असते, "आम्ही इतकी बाळंतपण काढली, त्यांना काय झाले, आम्हाला काही कळत नाही का?" आणि मग बाळाला काही झाले की बापाने त्याला घेउन दवाखान्याचा खेपा घालायच्या. ह्या सगळ्या बायकांना स्वत:ला डॉक्टर पेक्षा किती जास्त समजते आणि नवजात अर्भकांना ह्याच कशा व्यवस्थित संभाळु शकतात याची खुमखुमी मिरवायची असते, दुसरे काही नाही. त्यांच्या मते पुरुषांना बालसंगोपणातले काही कळत नाही आणि ह्या बाबबती त्यानी त्यांची टंग अडवु नये, असे असते.
म्हणजे आपण पुरुषांनी काय करायचे, तर नुसते बघत बसायचे. बाळाच्या बाबतीत ह्या बायकांनी त्यांचा हट्ट पुर्ण करायचा आणि काही बिघडले की आपण पुरुषांनी, आपण बाप आहोत म्हणुन त्या चुका निस्तारत फिरायचं.

आमचे बाळोबा बाकी मस्त आहेत. त्याचे कसे आहे माहीती का - "अपनी धुन मे रहता हुं". मस्त झोपायचे, भरपुर आळस द्यायचा, मनसोक्त पोटोबा करायचा, काही दिसते का ते बघायचे, वाटलेच तर गालातल्या गालात हसायचे, अधुन मधुन गळा काडुन स्वत:च्या आवाजाची चापपणी करायची, पुन्हा पोटोबा करायचा आणि मस्त झोपायचे. मी सकाळी एवढी कटकट केली पण हे साहेब आपल्याच मस्तीत गुल. असच जर कायम जगता आलं तर किती मस्त होईल!

जाता जाता सुचलेले शहाणपण. . . घरात लहान मुलं असतांना, बाळंतिण असतांना आणि तसे म्हणाल तर येरवी सुद्दा शक्यतो भांडण होऊ देउ नये. आणि ही एक गोष्ट मात्र माझ्या . . . बापाच्या हातात आहे. !

Saturday, January 07, 2006

माझो बाबु केल्यानी...

केल्यानी. . . सर्वांनी माझोच बाबु केल्यानी. मी काल ठरावलेलय की माझ्या झिलाक (मुलगा) मीच न्हाउ घालतलय म्हणान. पण त्याचे आवशीन आणि आजीयेन माझोच बाबु केल्यानी, आता बोला! त्येंचोना पयला पासोनच ह्या बाबतीत माका विरोध होतो. माका माहिती होता ता, पण मी त्या कडे कानोडोळो केलय आणि काय सांगु चाकरमाण्यानु, थयच माझी फसगत झाली.
तुमका ठाउकच असात, मी तुमका काल सांगलेलय की माझ्या झिलाक ती मावशी न्हाऊ घालुक येता ता माका जरा देखिल खपना नाय. तसा वैद्द्यान पण सांगितल्यान. आणि त्यामुळे माझो ईचार आणखिनच पक्को झाललो. मी हाफीसातसुन घाराक ईल्यावर डायरेक डिकलेर करुन टाकलय "माझे झिलाक उद्यापासुन मी न्हाऊ घालतलय. त्या मावशेक निरोप धाड, उद्यापासुन हडे येउ नको". झाला. . घरात एकच गोंधळ.
घरातल्या सगळ्यांचो माझ्याकडे बघण्याचो दृष्टीकोनच बदाललो. माझी बायको माझ्याकडे अशा काय नजरेन बघाक लागली जसा काय मी कोणी राक्षसच आसय. घरातल्या सगळ्यांच्या बडबडीचो अर्थ एकच होतो - "बाळाचो बापुस, कृपालीचो घो, त्याच्या झीलाक स्वत: न्हऊ घालण्याचो जगायेगळा आणि एक अघोरी कृत्य करुक निघालोहा." मग काय सगळ्यानी माझ्या विरुद्ध बंड पुकारलो. माका वाळितच टाकला. सगळ्यानी माझ्याशी बोलुचा टाकला. मी काम करत बसलो तर माका जेउचा पण कोणी ईचारल्यानी नाय. माका कळला, ह्या सगळा कशासाठी चाललला ता, पण मी जरो देखिल डगमगुक नाय.
सकाळी सगळो येगळोच खेळ चललेलो. घरात सगळा शांत होता जसा काय आदल्यादिशी रातिक काय घडुकच नाय. माझी झोप मोडुक नये म्हणान सगळे घरात दबक्या पावलांनी वावरत होते. कोणी कालचो ईशय काडुक नाय. मावशी पण ठरल्यायेळेक ईली नाय. मी आतल्या खोलीत गेलो तर बायको झिलाक दुध पाजा होती. मी थोड्यायेळान आत गेलय तरी ताच. थोड्या येळान माका आईन कोळसे घेउन येऊक सांगिताल्यान. बाळाक धुरी देऊ साठी कोळशे लागतत. झाला मी थयच फसलो. मी आपलो गाफिल होउन कोळसे घेउक घराबाहेर पडलो आणि हयसर ह्यांनी बाळाचो आंघोळीचो कार्यक्रम उरकुन घेतल्यानी. आता मी घराकडे ईल्यावर माका समाजला सगळा. लय संताप झालो, पण सांगतलय कोणाक. माझ्या सुखाचो ह्या सर्वांनी असो कोळसो केल्यानी.
मगे मी ईचार केल्यावर माका समाजला, बाळाच्या बाबतीत आईच्या भावना जास्त महत्वाच्या असतत. जोपर्यंत त्येंच्या वागण्याचा बाळाक त्रास होणार नाही तोवर त्येंका त्येंच्या मनासारखा करुक देऊक काय हरकत नाय. आणि खरा सांगु आईच्या वागण्याचो बाळाक कधी त्रास होत नाय. आणखी येक सांगतय, कधी कधी बाळाचो बापुस खुप आगतिक असतो. त्येचा ही बाळासारखा होता, सांगुकहोव जमना नाय आणि सहनही करुचा लागता.
काय पटला ना!.

जाता शेवटची वाइच विनंती आसा, माझ्या झिलाचो बारसो करुचो आसा. त्याचा नाव काय ठेउचा ता सुचना नाय. पंचागाप्रमणे 'प', 'ट' आणि 'ण' अक्षरा इलित. पण त्याच्या वरुनच ठेऊचा असा काय नाय. तेव्हा तुमका काय तरी मस्त, सुंदर, आशयघन नाव सुचत असात तर जरुर कळवा.

Friday, January 06, 2006

बाळाची आंघोळ . . .

आज सकाळी बाळाला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम बघितला. इतक्या दिवसांनी आज बघण्याचे कारण म्हणजे रोज मी ऑफिसला गेल्यावर त्याची आंघोळ होते. आज मला उठायला जरा उशीर झाला म्हणुन मला हा "बाळाची आंघोळ" नामे उपक्रम बघायला मिळाला. अबब. . . केवढा हा खटाटोप !

आमच्या येथलीच एक वयस्कर बाई बाळाला आंघोळ घालायला येते. सकाळी आईच्या दुधाची न्याहारी झाल्यामुळे बाळोबा मस्त खुश होते, आणी हा मावशी नावाचा व्हिलन त्याच्या शो मध्ये आला. हा व्हिलन त्याचा आईने आणि आजीने संगनमत करुन त्याचा आयुष्यात आणला आहे हे अजुन त्याला समजलेले नाही हे एक बरेच झाले. तर, आमच्या बाळाच्या आंघोळीचा हा इतीवृतांत. . .

आधी त्या "मावशी"ने बाळाचे सर्व कपडे काढले. आमच्या बाबुला कपडे काढले की राग येतो. लगेच तोंड वाकडे करुन त्याने त्याचा राग आळवायला सुरवात केली. आवाज चांगला आहे पटठ्याचा. कपडे काढुन झाल्यावर मावशीने त्याला मांडीवर झोपवला आणी मस्त तेल लावुन रगडायला सुरवात केली. तसे बाबुचा सुर चढायला लागला. मैफिल रंगायला लागली होती. बाळाची पुढची बाजु रगडुन झाल्यावर मावशींनी त्याला हळुच पालथा केला. झाले आता तर त्याचे रडायची पण बोंब झाली. मावशींनी आपले मस्तपैकी पिठ मळल्यासारखे त्याच्यावर मालिश नावाचा उपक्रम राबविला.

मालिश संपल्यावर आता बाळाच्या आंघोळीची तयारी सुरु झाली. आता "बाळाची आंघोळ" नाटकाचा दुसरा अंक सुरु झाला. परिस्थीती तीच फक्त जागा बदलली. बाळोबा खोलीतुन मोरीत आले पण अजुन मावशींच्या मांडीवरच. आधी सर्वांगाला बेसन लावण्यात आले. मग बेबी सोप लावुन आंघोळ घालण्यात आली. अंगावर पाणी पडताच बाळासाहेबांनी असा काय सुर लावला म्हणुन सांगु, "बाळगंधर्व" मोरित अवतिर्न झाल्या सारखे वाटले. आंघोळ झाल्यावर बाळाला शेक देउन कापडात असे काही गुंडाळले की जसे काही ते ह्या सर्व उपद्रवाला कंटाळुन पळुनच जाणार आहे.

खरेतर जुन्या रिती, पद्धती पाळण्याच्या नादात व अट्टाहासापायी तान्हुल्यांवर इतका अतीरेक केला जातो, पण सांगेल कोण. डॉक्टरनी मला व कृपालीला (माझी पत्नी) बरोबरच सांगीतले की बाळाला आईनेच आंघोळ घालावी. आंघोळ घालतांना त्याच्याशी गप्पा माराव्यात, हसत-खेळत आंघोळ घालावी. असे केल्याने बाळ हसरे व खेळकर होईल. पण कृपालीला एवढ्या लहान बाळाला आघोळ घालायची भीती वाटते.
सकाळचा सर्व खाटाटोप बघुन मी ठरवुन टाकले की उद्यापासुन बाळाला मी आंघोळ घालणार. खरे पाहीलेतर डॉक्टर सुद्धा सांगतात की बाळांना कसल्याही तेल, पावडर, शॅम्पू, वैगरेची गरज नसते. त्यांची त्वचा ह्या सर्व गोष्टींसाठी तयार नसते. तसेच एवढ्या लहान बाळांना कसल्या-कसल्या ऍलर्जी आहेत हे सुद्धा आता माहीत नसते व या तेलांमध्ये, पावडरमध्ये काय काय रसायनं घातली असतात ते देवच जाणे.

तर मी ठरवीले आणी घरी आल्यावर कृपालीकडे माझा निर्णय लगेच जाहीर करुन टाकला "जर तुला बाळाला आंघोळ घालायला भिती वाटत असेल तर उद्या पासुन बाळाला मी आंघोळ घालणार". मला ह्या सुखा पासुन वंचित रहायचे नाही, कारण हे सुख मला बाळ मोठ झाल्यावर मिळणार नाही. मला माझ्या बाप होण्याच्या सुखात जराही कसुर ठेवायची नाही.

झाले. . . . माझा निर्णय ऐकुन घरात सगळ्यांना टेंशन आले आहे. बघु उद्या मला सहकार्य करतात की माझाच बाबु करतात ते.

Wednesday, January 04, 2006

एक अनुभव्

लहानपणा पासुन बघतोय, आई लहान मुलांना मांडीवर घेऊन "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे म्हणायची. अजुनही म्हणते. तिला आजोबांनी असे म्हणायला सांगितले होते. तिला त्याचे कारण विचारल्यावर आई सांगते की असे बोलल्याने बाळ रडायची थांबतात, आणि हुशार होतात. आम्हाला चेष्टा वाटायची.
मला मुलगा झाला तेव्हा मला त्याचा अनुभव आला. बायकोचे सिझर झाल्यामुळे दोन दिवस बाळाला आईचे दुध देता आले नाही. बाळ भुकेमुळे रडायचा. मग मला आई काय करायची ते आठवले आणि तसे मी सुद्धा करयचे ठरविले. बाळाला मांडीवर घेउन मी सुदधा "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे गायला सुरवात केली, आणि काय आश्चर्य, बाळ थोड्यावेळातच रडायचे थांबले आणि एकटक माझ्या कडे बघायला लागले. मी हि घटना बायकोला सांगितली. तीने सुद्धा असे करुन बघितले आणि तीला ही माझ्यासारखाच अनुभव आला.

आज मी असे ठरविलेकी बाळाशी खेळतांना सगळेच काढतात तसे उगाच तोंडातुन चित्रविचीत्र आवाज काढायचे नाहीत. त्या ऐवजी अंक, पाढे, बराखडी वै. म्हणायची. लहाणपणापासुन हे त्याच्या कानावर पडल्याने, पुढे त्याची त्यातील गोडी वाडेल. ते त्याला नविन नसेल.
मला वाटते बाळ गर्भात असतांना आणि जन्माला आल्यावर, पालकांनी त्याच्या कानावर जर ठराविक गोष्टी जाऊ दिल्या तर आपण त्यांच्या करिअरची दिशा ठरवु शकतो.

Tuesday, January 03, 2006

जन्माला घालण्याचे सुख . . . अवर्णिय!

25.12.2005 रोजी माझ्या जिवनात् एका नविन, गोंडस सभासदाची भर पडली. मी एका सोनुल्याचा बाप झालो.
बाळ, माझे स्वत:चे बाळ, प्रथम हातात घेण्याचा अनुभव अवर्णिय होता. माझी प्रथम संतती काही करणामुळे जन्मल्यानंतर आठ दिवसात वारली. हि घटना साधारण दिड वर्षापुर्वी घडली होती. त्यावेळेस, हाती पैसा असुनही, आपण किती गरिब आहोत याची जाणिव झाली. मगिल अनुभवामुळे या वर्षी जरा दडपण होते, पण सर्व काही व्यवस्थित पार पडले. आता घरातुन पाय लवकर निघत नाही. बाळाला बघत रहावेसे वाटते.
भरपुर झोपा कडतो, मग मस्त आळोखे-पिळोखे देत उठतो. जांभई दिल्यावर मस्त हसतो. सगळं काही एकदम मस्त. त्याला जन्माला येउन अजुन अवघे 10 दिवसच झाले आहेत परंतु तो आता पासुनच कुशीवर परतायला लागला आहे. मान देखिल ऊचलायला बघतो.

आजपासुन ह्या ब्लॉगवर त्याची प्रगती, त्याच्या गमती-जमती लिहीणार आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या आनंदात सहभागी व्हावे ही विनंती. मुलाला वाढविताना, संभाळतांना येणार्‍या अडचणी, अनुभव, होणार्‍या गमती-जमती मला तुमच्या बरोबर शेअर करायच्या आहेत. एक बाप म्हणुन येणारा अनुभव मला इतर बापांबरोबर शेअर करायचा आहे. आपण ही आपले अनुभव कळवावेत.

Note: This message is posted using Unicode in Devnagari (Marathi). You can publish your comments in English or Devnagari. To read the font, you will require to enable Indic Language support in your operating system. for details visit http://www.bhashaindia.com